Wednesday 26 February 2014

दसरा(विजयादशमी)




नवरात्री संपल्यानंतर शेवट्चा दिवस म्हणजे दसरा यालाच विजयादशमी असेही म्हणतात. हा दिवस विजयाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. व्यक्ती आणि समाज यांच्यात वीरता प्रकटावी यासाठी दस-याचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात हमखास यश मिळणार, अशी समजूत आहे.दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.


हा सण आश्विन शुध्द दशमी हा दिवस आहे.  प्रभु रामचंद्रांच्या वेळेपासूनच हा दिवस साजरा केला जातो. रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी हयाच दिवशी प्रस्थान केले होते. तसेच पांडवांचा अज्ञातवास संपला तेव्हा त्यांनी याच दिवशी शमी वृक्षाचे पुजन करून आपली या वृक्षावर लपवीलेली शस्रास्रे पिन्हा घेतली. अशी माहीती महाभारतात मिळते.या दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

या सणाविशयी अनेक कथा आहेत. त्यपैकी एक म्हणजे रघुराजावर सीमोल्लंघनाचा प्रसंग आला होता. त्यावेळ  रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजीत यज्ञ केला. व त्याने सर्व संपत्तीचे दान केले.  आणि  तो एका पर्णकुटीत राहिला. वरतंतुचा शिष्य कौत्स तिथे दक्षिणा मागण्यासाठी आला. त्याला १४ कोटीसुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघुराजालाला वाटले जर कौत्स्न घेता रिकाम्या हाताने गेला तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील. हे हौ द्यायचे नाही म्हणुन त्याने कुबेराला युध्दाचे आव्हान दिले. कुबेराने घाबरुन आपटा शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. त्यातील फक्त  १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्स घेवुन जातो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. तेव्हापासुन या वृक्षाने वैभव दिले म्ह्णुन याचे पुजन केले जाते.

दसरा शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दस-यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.

Tuesday 18 February 2014

गोकुळ अष्ट्मी

                                                                                                                       


श्रावण वद्य अष्टमीचा दिवस हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस होय. तोच दिवस गोकुळ अष्टमी म्हणून साजरा करतात. श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार श्रीकृष्ण किंवा विष्णूच्या मंदिरात हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हीच श्रीकृष्ण जयंती होय. श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला म्हणून त्याला गोकुळ अष्टमी असे म्हणतात. श्रीकृष्ण श्रावण वद्य अष्टमीस तुरूंगाच्या कोठडीत जन्मास आले, अशी कथा प्राचीन ग्रंथांत आहे.

मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा मुलगा कंस याने तुरुंगात टाकले. आणि त्याचे राज्य हस्तगत केले. आपल्या चैनीसाठी कंसाने प्रजेवर अन्याय-अत्याचार केले. त्याच्या बहीणीचे लग्न झाले. वरातीचा रथ वसुदेवाच्या घरी जात असताना आकाशवाणी झाली की, ‘दुष्ट कंस, ज्या बहीणीला तू मोठ्या प्रेमाने सासरी पाठवत आहेस, तिचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे.’ हे ऐकून कंस देवकीला माराण्यासाठी गेला पण वसुदेवाने त्याची समजूत घातली आणि त्याने वचन दिले की, देवकीला होणारी मुले मी तुझ्या स्वधीन करेल.त्यमुळे त्यांना कारागृहात टाकले. त्या दोघांवर सक्त पहारा ठेवला. देवकीची सात मुले कंसाने मारली होती. श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. बंदीशाळेतील सर्व पहारेकरी झोपले असताना वसुदेव त्या बाळाला यमुना नदी ओलांडून नंदाच्या घरी गेले. ते बाळ नंदाच्या घरी ठेवले आणि यशोदेच्या मुलीला घेऊन परत कारागृहात आले.


हा जन्मोत्सव श्रावण वद्य प्रतिपदा ते अष्टमी असा आठ दिवस असतो. काही ठिकाणी पाच दिवस, तर काही ठिकाणी तीन दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजेत केले जातात. या दिवशी उपवास करतात. अष्तमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून मंदिरात छोटा पाळणा बांधून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात. पाळण्यास झोके देउन भजन, गाणी गायली जातात. या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो. मातीच्या एका मोठ्या मडक्यात दूध, दही, ताक, लाह्या, पोहे अशा पादार्थांचे कालवण करून भरतात. तो घट उंच जागी टांगून ठेवला जातो. आणि तरूण आणि आता तरूणीही एकमेकांच्या खांद्यावर चढून ती दहीहंडी फोडतात. त्या फुटलेल्या दहीहंडीचा तुकडा घरात टाकला की उंदीर होत नाहीत अशी समजूत आहे.

भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, व्दारकाया ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट इथे हा सण साजरा केला जातो.

Thursday 13 February 2014

मकर संक्रांती


                                    
पौष महीन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, आणि संक्रांत म्हणजे संक्रमण. म्हणजेच पुढे जाणे. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत असतो. म्हणून  या काळाला उत्तरायणही म्हणतात. म्हण्जे सूर्य मकर राशीत आला की मकर संक्रांत होते. या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो.व दिवस थोडा थोडा मोठा होत जातो.
  
संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत, व किक्रांत असे तीन सण एकत्र येतात.शेतक-याच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असतो. मार्गशीर्ष- पौष हे महीने म्हणजे सुगीचे दिवस असतात. या काळात गहू-शाळू पिकलेला असतो, तसेच हरभरा, वालपापडा, ओल्या शेंगा आदि पिके आलेली असतात, यावेळी शेतकरी वर्गाच्या कष्टाला यश मिळते म्हणून हा सण समाधानाचा सण असे म्हटले जाते.
                   
संक्रांत ही थंडीच्या दिवसात येत असते. थंडीत शरीराचे अवयव आखडून गेलेले असतात. रक्तभिसरण मंद होण्याची शक्यता असते,रक्तवाहीन्यांवर थंडीचा परिणाम होत असतो. असतो. अशा वेळी शरीराला स्निग्धतेची गरज असते.आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पुर्ण करतात. हे तिळ औषध म्हणुन काम करू शकते. तिळ आणि गुळ यांत उष्णता निर्माण करण्याचा  गुण असल्यानेही  तिळ आणि गुळ या दिवशी वाटले जातात. तसेच या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. सामान्यतः पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात, किंवा इमारतीच्या छ्परावर जावे लागते. त्यामुळे थंडीत सुर्याचे ऊन मिळते हा त्यामागचा हेतू आहे.

मकर संक्रांतीच्या अनेक कथा आहेत.त्यापैकी एक म्हणजे पूर्वी संकरासुर नावाचा एक दैत्य होता. तो खुप उपद्रवी होता. त्याचा नाश करण्यासठी संक्रांती देवीने भयंकर रूप धारण केले. ही देवता साठ योजने पसरली असुन तिचे नाक-ओठ लांब असून तिला नऊ हात असून तिची आकृती पुरूषाची आहे,प्रत्येक वर्षी तीचे वाहन, आयुध, तिची भूषणे बदलतात, अशी कल्पना आहे.

संक्रांतीच्या दिवशी काही सुवासिनी पाटावर संक्रांतीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवितात. त्या दिवशी संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलवितात. एका मातीच्या मडक्यात भुईमुग, गाजर, उसाचे तुकडे, शेंगा, पैसा, सुपारी इ. ठेवून त्याची पूजा करतात. तसेच संक्रांत हा स्रियांचा- विशेष करून लग्न झालेल्या मुलींचा सजण्याचा सण लग्नानंतर संक्रांतीला पहील्या वर्षी तिळवणीचा सण करण्याची महाराष्ट्रात पध्द्त आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलीला हलव्याचे दगिने घालून सजवितात. हा एक सण असा आहे की, जो सासू सुनेसाठी करते.